बांबू कोंबांची आरोग्यदायी आणि उन्नत शेती

बांबू ही एक गवतवर्गीय वनस्पती आहे. दैनंदिन जीवनातील बांबूचे अनेक उपयोग जरी सर्वश्रुत असले तरी त्याचे खरे सामर्थ्य मात्र बांबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी अज्ञात राहिलेले आहेत. गरीबांचे लाकूड हा शब्दप्रयोग बांबूसाठी वापरला जात असला तरी बांबूच्या कोवळ्या कोंबांना मात्र अति श्रीमंतांच्या खाद्यसंस्कृतीत विशेष स्थान निर्माण झालेले आहे. बांबू इमारती बांधकाम, फर्निचर, कागद निर्मिती, कापड घरगुती उपयोगाच्या वस्तू, शेतीकाम यासारख्या उपयोगासाठी प्रामुख्याने वापरला जात असला तरी बांबूच्या असामान्य औषधी गुणधर्मांमुळे बांबूसारख्या एक सामान्य वनस्पतीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. बांबूची पेये (चहा, बिअर आणि वाईन) तेल, औषधे आणि विविध खाद्यपदार्थ सुद्धा बनवले जातात. 

 

बांबू हा त्याच्या उंच आणि जलद वाढीचा दर, स्वत:ची नूतनीकरण क्षमता आणि बांबूची टिकाऊपणा यामुळे अतुलनीय आहे. मानवसृष्टीच्या निरोगी जीवनासाठी बांबू हा एक महत्त्वाचा स्त्रोत आहे आणि त्याच्या कोवळ्या कोंबांमध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक फायदे आहेत. 

 

बांबूच्या कोवळ्या कोंबांचा वापर हा मुख्यतः चायनीज आणि थाई रेस्टॉरंट्समध्ये दिसत असला तरी भारत, चीन, म्यानमार, श्रीलंका इत्यादी अनेक आशियाई देशांमध्ये बांबू कोवळे कोंब पारंपरिक पद्धतीने खाद्यपदार्थांमध्ये सर्रासपणे वापरले जातात. भारतामध्ये ईशान्येकडील राज्यांत सोबत महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, उडीसा, अंदमान-निकोबार या राज्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात बांबूचा अढळ असून इथल्या खाद्यसंस्कृती त्याला वेगळेच स्थान आहे बांबूचे एकूण व्यवसायिक महत्त्व मात्र दुर्लक्षित राहिले आहे. त्यापैकी बांबूचा खाद्य आणि औषधांमध्ये होणाऱ्या वापराचे महत्त्व अति दुर्लक्षित राहिले आहे. 

 

आपण बांबूच्या ताज्या, मांसल आणि मऊ कोंबांपासून लोणचे, सूप, सलाड, स्प्रिंग रोल, बांबू करी आणि बांबूच्या भाजीबद्ऐकत होतो. पण आत्ता बांबूचे पीठ, बांबू बिस्किट, बांबू जाम/कॅंडीज्, आईस्क्रीम, पास्ता, नूडल्स, केक आणि यासारखे अनेक खाद्यपदार्थ बांबूच्या कोवळ्या कोंबांपासून बनवले जात आहेत. या पदार्थांना देश-विदेशातील अतिश्रीमंत वर्गात प्रचंड मागणी असलेली दिसून येते. जगभरात होणाऱ्या बांबूच्या कोवळ्या कोंबांच्या खरेदीमध्ये जपान हा सर्वाधिक मोठा खरेदीदार देश आहे तर चीन हा सर्वात मोठा विक्रीदार देश आहे.

 

जगभरात बांबू उत्पादक देशांमध्ये भारत हा सर्वाधिक बांबू क्षेत्र असलेला नंबर एकचा देश असला तरी बांबू उत्पादनांच्या निर्यातीमध्ये चीनचा नंबर पहिला लागतो. चीनची अर्थव्यवस्था ही बांबू आधारित उद्योग-धंद्यांमुळे बळकट झालेली आपल्याला दिसून येते. मात्र भारत देश बांबू आधारित उद्योगधंद्यांमध्ये खूपच मागे राहिलेला दिसतो. ही परिस्थिती बदलण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय बांबू अभियान सुरु केलेले असून या अभियानाद्वारे मोठ्या प्रमाणात बांबू लागवड आणि बांबू आधारित प्रक्रिया उद्योग निर्मिती केली जात आहे. 

 

बांबूच्या कोवळ्या कोंबांचा आहारात वापर करण्यासाठी त्यांना सुकवले, शिजवले, आंबविले, खारवले जाते आणि हवाबंद डब्यात साठविले जाते.  या पद्धतीने बांबूआधारित उद्योगांमध्ये बांबूच्या कोवळ्या कोंबांवर प्रक्रिया करुन त्यांची साठवणूक आणि उपपदार्थ तयार करण्यामध्ये फार मोठी संधी असून यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसोबत दारिद्र्य निर्मूलनाचे कार्य प्रभावीपणे साकारले जाऊ शकते. 

 

या सर्व पार्श्वभूमीवर बांबूच्या कोवळ्या कोंबांची आरोग्यदायी आणि उन्नत शेतीकडे सर्व सामान्य शेतकऱ्यांनी वळले पाहिजे. ही आरोग्यदायी आणि उन्नत शेती कशी केली जाऊ शकते; हे समजून घेण्यापूर्वी बांबूचे औषधी गुणधर्म समजून घेतले पाहिजे.

 

 बांबूचे औषधी गुणधर्म:-

 बांबूच्या अनेक व्यापारी मूल्यांसोबतच त्याचे औषधी गुणधर्म अनन्यसाधारण आहेत. बांबूचे मूळ, पान, बिया, कोवळे कोंब आणि वंशलोचन या सर्वांचा वापर औषध निर्मितीसाठी केला जातो. अनेक पोषक तत्त्वांनी युक्त असलेल्या बांबूच्या कोंबांना सुपर फूड म्हटले जाते. दरवर्षी पावसाळ्यात नवीन बांबू रुजून जमिनीतून वर येतात, तेव्हा ते कोवळे असतात. हेच कोवळे मांसल आणि मऊ असलेले कोंब हे भाजी आणि इतर खाद्य पदार्थ तयार करण्यासाठी वापरले जातात. बांबू ही खूपच तंतूमय आणि क्षारयुक्त वनस्पती आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात न्यूट्रिएंट्स, विटामिन्स, मिनरल्स, फायबर आणि अॅन्टिऑक्सिडेंटस् असतात. तसेच फॅट आणि कॅलरीज अत्यंत कमी प्रमाणात असतात. बांबू खोडांच्या पेरात तयार होणारे वंशलोचन थंड, पौष्टिक आणि कामोत्तेजक असते. हे कफ, क्षय आणि दमा यांचेवर अत्यंत गुणकारी आहे. बांबूच्या मुळांचा रस भाववर्धक आहे. त्याची साल पुरळ बरे होण्यास उपयुक्त आहे. बांबूचे बी रुक्षोष्ण असून लठ्ठपणा व मधुमेह असणाऱ्यांनी सेवन केल्यास फायदेशीर ठरतात. बांबूच्या कोवळ्या कोंबांचा किंवा कोवळ्या पानांचा रस काढा गर्भाशयाचे संकुलन होण्यासाठी बाळंतपणात देतात. यामुळे विटाळ पडतो व विटा स्त्राव नियमित होतो. बांबूच्या कोवळ्या कोंबांपासून तयार केलेले लोणचे व कढी अपचनात उपयुक्त आहे यामुळे भूक व पचनशक्ती वाढते. बाळंतपणात नाळ पडून गेल्यानंतर गर्भाशयाची पूर्ण शुद्धी होण्यासाठी ही भाजी बाळंतिणीला देतात. तसेच स्त्रियांचा विटाळ साफ होत नसल्यास ही भाजी गर्भोत्तेजक म्हणून द्यावी, यामुळे मासिक पाळी साफ होते. वजन व लठ्ठपणा कमी करणे, पचनशक्ती वाढवणे, कोलेस्टेरॉल पातळी नियंत्रणात ठेवणे रोगांना प्रतिबंध करणे हे महत्त्वाचे औषधी गुणधर्म बांबूमध्ये आढळतात.

बांबूच्या कोवळ्या कोबांची शेती:- 

भारत सरकारने बांबूच्या वेगवेगळ्या अठरा जातींना व्यावसायिक लागवडीसाठी प्रमाणित केले आहे. यामध्ये माणगा, मानवेल, कटांग, बांबूसा बल्कोआ, बांबूसा टुल्डा, बांबूसा न्युटन्स, डॅन्ड्रोकॅलमस ब्रांडिसी आणि डॅन्ड्रोकॅलमस अॅस्पर या जातींचा प्रामुख्याने समावेश आहे. यांपैकी माणगा, मानवेल, कटांग आणि डॅन्ड्रोकॅलमस अॅस्पर या जातींच्या बांबू कोवळे कोंब खाण्यायोग्य असतात. माणगा आणि मानवेल हे बांबू मध्यम जाडीचे असल्याने त्यांची लागवड ही १२ फूट बाय ८ फूट अशी केली जाते. तर कटांग आणि डॅन्ड्रोकॅलमस अॅस्पर या जाती मोठ्या जाडीच्या त्यांची लागवड ही १५ फूट बाय १५ फूट अशी केली जाते. बांबू काठी आणि कोंब विक्री या दुहेरी उद्देशाने वरील लागवडीकडे आपण बघू शकतो. दरवर्षी प्रत्येक बेटातून येणाऱ्या नवीन बांबू कोबांची विरळणीसारख्या योग्य पद्धतीने नियंत्रित करण्यातून विक्री योग्य बांबू काठी आणि कोंब सुद्धा उपलब्ध होऊ शकतात. बांबू काठीच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नाबरोबरच किंबहुना तेवढेच उत्पन्न अधिकचे शेतकऱ्यांच्या पदरी पडू शकतील.

 

पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या बांबू काठी विक्रीऐवजी त्यामध्ये प्रतवारी करुन मूल्यवर्धन करुन बांबू काठी विक्रीतून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. सोबतच बांबूच्या कोवळ्या कोबांची शेती, त्यावर प्रक्रिया आणि खाद्यपदार्थ निर्मितीमधून ग्रामीण भागातील स्त्रियांना चांगला रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे बांबूच्या व्यावसायिक लागवडीतून कोवळ्या कोबांची शेती करुन या शेतीतून चांगल्या प्रकारे भरघोस उत्पन्न मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी विशेष प्रयत्न करावे. जागतिक बांबू उद्योगातील अनेक संधींचे सोने करणे त्यांना शक्य आहे. बांबूला हिरवे सोने संबोधण्यामागचे एक कारण बांबूच्या कोवळ्या कोंबांना असलेली मागणी ही सुद्धा आहे.

 

- सतीश कांबळे (9320162386)

बांबू उत्पादक शेतकरी

(पत्ता :- अश्वघोष बांबू स्टुडिओ, मु. पो. पेरणोली ता. आजरा जि. कोल्हापूर)